पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचे आयोजन उद्या (दि. २६ ) पासून राज्यात सर्वत्र करण्यात आले होते. मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी कला संचालनालयाने परीक्षा केंद्रांना वितरीत केलेली प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकिटे परत करण्याच्या सुचना दिल्या असून तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागत असल्याचे कला संचलनालयाचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्वनियोजनानुसार ही परीक्षा २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत होणार होती. या वेळापत्रकानुसार परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकिटे राज्यातील केंद्रांवर वितरीत करण्यात आली आहे. पण, अचानक तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, ज्या केंद्रांनी ही मोहोरबंद पाकिटे ताब्यात घेतली असतील, त्यांनी ती वितरण केंद्रांना परत करावीत, अशा सूचना कला संचलनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी दिल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक www.doa.org.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पालक-विद्यार्थी अन् शिक्षकांमध्ये चर्चाचा विषय बनला आहे. याबाबत राज्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहे.