अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीचे काम एक जबाबदारीचे काम आहे. ते करत असताना आपल्या मतदान केंद्रात जे कर्मचारी असतील, त्यांनी टीम वर्क म्हणून काम केले तर कोणती अडचण निर्माण होत नाही. सध्या लोकसभा निवडणुकीत व्हि.व्हि.पँट मशीन चा अवलंब केल्यामुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे. मतदान कर्मचाऱ्यांना काही शंका असल्यास सेक्टर ऑफिसशी संपर्क साधून ते आपल्या अडचणी विचारू शकतात. वेळेत माँपकोल घेणे, ठरवलेल्या गाडीतच मतदान कर्मचाऱ्यांनी आपले साहित्य घेऊन जावे. असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित लोकसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचे स्वागत उपविभागीय अधिकारी सीमा हिरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत कर्मचारीवर्ग आणि कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, याबाबत मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष व इतर अधिकारी यांची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, मतदान केंद्राध्यक्ष व त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांनी व्हि व्हि.पँट, कंट्रोल युनिट बॅलेट युनिट या यंत्रांची विशेष काळजी घ्यावी. माँपकोल ठरलेल्या वेळेतच घ्यावे, तसेच सिलिंग कशी करावी ? याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
शेवटच्या टप्प्यात प्रश्नावलीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरे कर्मचारी वर्गाकडून काढून घेतली. यावेळेस अमळनेरसह व इतर तालुक्यातली कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सुरेश पाटील या मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यामुळे त्यांचा विशेष अभिनंदन करण्यात आले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळेस नायब तहसीलदार, महसूल व पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.