मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । एकनाथ शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठराव पारीत होण्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून यासाठी भाजप आणि शिंदे गटात मंथन सुरू झाले आहे.
राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. यात ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून ४ जुलै रोजी शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. यातील सर्वात महत्वाचा घटक हा विधानसभाध्यक्षपद होय. या पदासाठी भाजपतर्फे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव या पदासाठी समोर आले आहे. तर शिंदे गटातर्फे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातील आता कुणाची या पदावर वर्णी लागणार याचे उत्तर उद्याच मिळणार आहे.
दरम्यान, आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद हे अनुभवी नेत्याकडेच असावे असे शिंदे गट आणि भाजप यांनी ठरविले आहे. या अनुषंगाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात येईल असे मानले जात आहे.