मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे नव्याने आरक्षण निघल्यानंतर निवडणुकीच्या पहिल्या टप्याची अधिसूचना निघणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सुुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यात महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २८ जुलैला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत निघेल. आरक्षणाची प्रारूप अधिसूचना २९ जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. तर ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षण विहित नमुन्यात राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. तसेच, राज्यातील ११५ नगरपालिका आणि ९ नगर पंचायतींसाठी २८ जुलै रोजी ओबीसीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधी काढण्यात आलेल्या ९२ नगरपालिका आणि ८ नगरपरिषदांचे आरक्षण यात काढण्यात येणार नाही. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आरक्षण निघणार आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी ओबीसी आरक्षण सोडतीसाठी २८ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून ५ ऑगस्टला याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षण सोडत निघून याबाबत राजपत्रात सोडत नमूद होण्याआधी लोकनियुक्त नगराध्यक्षपदांचे आरक्षण निघणार आहे. यानंतर निवडणुकीची कोणत्याही क्षणाला अधिसूचना जारी होऊन साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पहिल्या टप्यातील निवडणुका होतील हे आता स्पष्ट झाले आहे.