नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणीपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचं पालन करूनच या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली गेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज त्यासंदर्भातला कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, पाच राज्यांमध्ये ६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे. आयुक्त पुढे म्हणाले की, एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र २ लाख १५ हजार ३६८ आहेत. १६२० मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचार्यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
दरम्यान, याप्रसंगी निवडणूक आयुक्तांनी मतदानाच्या तारखांची घोषणा केली. सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.
दुसर्या टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल. तिसर्या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल. पाचव्या टप्प्याचे नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल. सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसर्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल.
सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल. या सर्व निवडणुकांची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.