निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही : राज ठाकरे

raaj and mamta didi

कोलकाता (वृत्तसंस्था) केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज म्हटले आहे. ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्या पार्श्चभूमीवर त्यांनी आज कोलकात्यात जाऊन मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

राज व ममता यांच्यात सुमारे पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत ईव्हीएमबाबतचा आपला आक्षेप पुन्हा एकदा नोंदवला. ईव्हीएमला आमचा आधीपासूनच विरोध आहे. त्यासाठी आम्ही कोर्टातही धाव घेतली होती, असे नमूद करत जपान, ब्रिटनमध्येही ईव्हीएम नाही याकडे ममता यांनी लक्ष वेधले. राज यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक आयोग, कोर्ट या सगळ्यांवरचा आपला विश्वास उडाला असल्याचे सांगितले.

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी राज ठाकरे ‘पॉलिटिकल पीच’वर उतरले होते. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेने मनसेने टाकलेले पहिले पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिले गेले होते. मात्र या घडामोडींनंतर, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचेही बोलले जात होते.

Protected Content