Home क्राईम  कुत्र्याने चावलेली गाय पिसाळून ज्येष्ठ महिला गंभीर जखमी – नागरिक भयभीत

 कुत्र्याने चावलेली गाय पिसाळून ज्येष्ठ महिला गंभीर जखमी – नागरिक भयभीत

0
212

वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरात पुन्हा एकदा लंपी आजाराने गुराढोऱांमध्ये थैमान घातले असून, त्यात भर म्हणून मोकाट कुत्र्यांनीही हैदोस घालायला सुरुवात केली आहे. कुत्र्यांच्या चाव्यांमुळे पिसाळलेल्या जनावरांनी नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनांमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष सुनील माळी यांनी केली आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून लंपी आजाराने गायी व अन्य गुरांना त्रस्त केले असून, अनेक गायींची तब्येत खालावलेली आहे. याच दरम्यान, काही बाहेरगावाहून भरलेल्या ट्रकद्वारे मोकाट कुत्रे वरणगाव शहरात सोडण्यात आले आहेत. या कुत्र्यांनी शहरात थैमान घालत जनावरांना चावल्याच्या घटना घडत आहेत. कुत्र्याच्या चाव्यामुळे गायी पिसाळून जात असून, त्या नागरिकांवरही हल्ले करत आहेत. काल तिरंगा सर्कल परिसरात घडलेली घटना याचे एक गंभीर उदाहरण आहे.

तिरंगा सर्कल येथे एका गायीला मोकाट कुत्र्याने चावल्यामुळे ती गायी पूर्णतः पिसाळली. तिच्या शरीरात विषारी संसर्ग पसरल्याने ती आक्रमक झाली आणि भास्कर गावंडे यांच्या चहाच्या स्टॉलजवळ उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिला श्रीमती रेणुका माता साबळे यांना अक्षरशः शिंगावर उचलून फेकले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. याच पिसाळलेल्या गायीने इतर काही ज्येष्ठ नागरिकांनाही लोथाळले, त्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

या घटनांमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेखाली असून, अनेकजण घराबाहेर निघण्यासही घाबरत आहेत. नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्याने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी श्री. सलीम तडवी यांना लंपीग्रस्त गायींवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी वारंवार विनंती केली गेली आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यासोबतच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडेही मोकाट कुत्र्यांचे आणि जनावरांचे नियंत्रण करण्याची मागणी झाली आहे. या मोकाट प्राण्यांना ताब्यात घेऊन गोशाळेत हलवावे, अशी विनंती भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, नगराध्यक्ष सुनील काळे, नाना चौधरी, मिलिंद भैसे, कृष्णा माळी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके, फझल शेख, अजमल खान, गोलू राणे, कामगार नेते मिलिंद मेढे, पप्पू ठाकरे, बळीराम दादा सोनवणे, योगेश माळी, रमेश पालवे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण वरणगाव शहर या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. लंपी आजार, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, आणि पिसाळलेल्या जनावरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करून जनतेला दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांतून होत आहे.


Protected Content

Play sound