राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत वृध्द महिला ठार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील महिला आयटीआय जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रमणबाई रामराव पाथरवट (वय-६५) रा. भगिरथ कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, रमणबाई पाथरवट या भगिरथ कॉलनी येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. पाण्याचा माठ विक्री करुन उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी जिजाबाई राजेंद्र कोल्हाटकर या त्यांच्या सासरच्या मंडळींसह महिला आयटीआय जवळ रस्त्यावर माठविक्री करतात आणि तत्पुत्या झोपड्या उभारून तेथेच वास्तव्यास आहेत. शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रमणबाई पाथरवट या शौचास निघाल्या होत्या. महामार्गाच्या बाजुने पायी चालत असतांना आकाशवाणी चौकाकडून सुसाट वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पसार झाला. अपघातात जखमी रमणबाई यांना जिल्‍हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. पोलिसांनी कुटूंबीयांकडून अपघाताची माहिती घेतल्यानंतर अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Protected Content