धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील गोविंद स्टिल दुकानासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने पायी जात असलेल्या वृध्द व्यक्ती हे गंभीर जखमी झाल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लालचंद मोतीराम पाटील वय ७० रा.पिंप्री ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता लालचंद पाटील हे गावातील गोविंद स्टिल दुकानासमोरून पायी जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीबी ९९५९) ने जोरदार धडक दिली. या अपघातात लालचंद पाटील हे वृध्द गंभीररित्या जखमी झाले. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालक भगतसिंग प्रेमसिंग पाटील रा. भोद ता.धरणगाव याच्या विरोधात शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहे.