अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द जागीच ठार !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते धुळे रस्त्यावरील मंगरूळ शिवारातील हॉटेल वृंदावन जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष चिंतामण चांदसरे वय-६९, रा. चाळीसगाव असे मत झालेले वृद्धाचे नाव आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, संतोष चांद्सरे हे वृद्ध आपल्या कुटुंबीयासह चाळीसगाव शहरात वास्तव्याला होते. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ते दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएच ४२३०) ने अमळनेरकडून धुळे रस्त्यावर जात असताना रस्त्यावरील मंगरूळ शिवारात हॉटेल वृंदावन समोर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात संतोष चांदसरे या वृद्धाचा मृत्यू झाला. मयत संतोष चांदसरे यांचा पुतण्या अभिजीत चांदसरे यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहे.