
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये अनोळखी इसमाने एका ज्येष्ठ पेन्शनधारकाला बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ७०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश हरचंद मोरे (वय- ६६, रा. चंदूअण्णा नगर, जळगाव) हे पेन्शनर आहेत. ते शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना, तेथे उपस्थित असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलले. कार्ड बदलल्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून तीन वेळा एटीएमद्वारे एकूण २५ हजार ७०० रुपये काढले आणि त्यांची फसवणूक केली. रमेश मोरे यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. टीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा तपास सुरू आहे.



