भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गडकरी नगरात वृध्द दाम्पत्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील गडकरी नगरामध्ये विजय कुलकर्णी ( वय ६५ ) आणि त्यांची पत्नी माधवी कुलकर्णी ( वय ६० ) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात चोट्यांचे टोळके शिरले. त्यांनी या दोन्ही जणांवर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. तसेच त्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड घेऊन येथून धुम ठोकली.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर या दाम्पत्याने फोडलेल्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी या पती-पत्नीला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे कुलकर्णी दाम्पत्याला जखमी करून लुट करणार्या टोळीने पुढील गल्लीमध्ये एका घरावर बॅटर्या चमकावत आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील रहिवासी जागे झाल्याने त्यांनी पुढे पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ताज्या वृत्तानुसार, विजय कुलकर्णी आणि माधवी कुलकर्णी यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व धर्मार्थ रूग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.