मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यभर गाजलेल्या सहायक पोलीस निरिक्षक अश्वीनी बिद्रे यांच्या खून खटल्यात पनवेल सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरविले असून याच प्रकरणातील एक संशयित माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचे भाचे राजू पाटील यांची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे.
सहायक पोलीस निरिक्षक अश्वीनी बिद्रे या 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस निरिक्षक अभय कुरंदकर याने त्यांचा गळा आवळून खुन केल्यानंतर त्यांचा मृतदेह इतरांच्या मदतीने वसईच्या खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणी अभय कुरंदकर याच्यासह त्याचा मित्र महेश पळणीकर व कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तर याच प्रकरणात कुरंदकरला मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजू पाटील याची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
पनवेल सत्र न्यायालयात सात वर्षे या प्रकरणाची सुनावली चालली. यात न्यायालयाने एकूण 80 साक्षीदार तपासले. यानंतर आज तिघांना दोषी तर एकाला दोषमुक्त ठरविले. तर या दोषींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी कुरूंदकरने अश्वीनी बिद्रे यांचा खून केला होता. त्याच दिवशी या गुन्हेगारांना शिक्षा मिळणार आहे.
अश्वीनी बिद्रे यांच्या खून खटल्यात एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील यांचे नाव आल्याने या प्रकरणात अनेक नेत्यांनी राजकीय भाष्य करत खडसेंवर टिका केली होती. जिल्ह्याच्या राजकारणात देखील अनेकदा याबाबत टिका केली जात होती. राजू पाटील यांना 10 डिसेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर अनेकदा त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. यानंतर आज न्यायालयाने राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. तर हे प्रकरण अजून उच्च व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता देखील आहे.