मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दोनदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र खुद्द खडसे यांनी यामागचे कारण जाहीर केले आहे.
याबाबत वृत्त असे की, एकनाथराव खडसे हे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या माध्यमातून उद्या मुक्ताईनगरात जंगी शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची तयारीदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथराव खडसे हे या नंतरदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे नेमके कारण काय ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर, प्रस्तुत प्रतिनिधीने खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शुभ मुहूर्त असल्यामुळे मी मंगळवारी अर्ज दाखल करणार आहे. तथापि, पक्षाची उमेदवारी यानंतर जाहीर झाल्यास एबी फॉर्मने युक्त असणारा अर्ज पुन्हा एकदा भरण्यात येणार आहे. यामुळे आपण दोनदा अर्ज भरू शकतो अशी माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.