मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी ३० डिसेंबर रोजी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होते. मात्र याच्याच आदल्या दिवशी खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले.
खडसे आता कोरोनातून बरे झाले असून ते आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून याचे विवरण मात्र अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलतांना खडसे यांनी कोरोनामुळे आपल्याला थोडा थकवा जाणवत असल्याचे सांगितले. ईडीच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.