खान्देशच्या सिंहाची विधानपरिषदेतही तीच तडफ ! (लेख)

मुक्ताईनगर– माजी मंत्री, आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा दिनांक २ सप्टेंबर रोजी वाढदिवस. यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्यास रोहिणीताई खडसे यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे यांनी !. वाचा हा विशेष लेख.

लोकनेते आमदार आदरणीय एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मन:पूर्वक शुभेच्छा. कोथळी सारख्या लहान गावातून सरपंच पदा पासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करून राज्याच्या महसुल मंत्री पदा पर्यंत प्रवास करणारे महनीय व्यक्तीमत्व म्हणजे एकनाथराव खडसे अर्थात सर्वसामान्य जनतेचे, कार्यकर्त्यांचे नाथाभाऊ !
कोथळी गावचे सरपंच ते राज्य मंत्रीमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. यात पाटबंधारे, उच्च शिक्षण ,अर्थ ,महसुल, कृषी, पशुसंवर्धन ,उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक अशा खात्यामध्ये आपल्या कारकिर्दीत महत्वाची कामगिरी बजावून तीस वर्षे भारतीय जनता पक्षाला वाड्या वस्त्यांवर पोहचविण्यात सिंहाचा वाटा उचलला.
परंतु तीस वर्ष पक्षासाठी मेहनत घेतल्या नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला संपविण्याचे षडयंत्र रचले गेले. एक वेळ अशी आणली गेली की, नाथाभाऊ राजकारणात संपलेःइथपर्यंत चर्चा घडवून आणल्या गेल्या. शेवटी या सर्व घृणास्पद प्रकारांना कंटाळून नाथाभाऊ यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला व शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला
पवार साहेबांनी नाथाभाऊ यांचे कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन नाथाभाऊ यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत पाठवले. पण तिथं सुद्धा कपटी राजकारण खेळले जाऊन बारा आमदारांची नियुक्ती रखडवली गेली. परंतु पवार साहेबांनी नाथाभाऊ यांना विधिमंडळ मध्ये आणण्याचे पक्के ठरवले असल्यामुळे त्यांनी आलेल्या विधानपरिषद निवडणूक मध्ये नाथाभाऊ यांना उमेदवारी देऊन निवडणून आणले. याच माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणार्‍या या लोकनेत्याचा वरीष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत प्रवेश झाला.

संसदीय कार्याच्या तीस वर्षाच्या प्रदिर्घ अनुभवाच्या जोरावर नाथाभाऊ यांनी विधापरिषदेच्या अधिवेशनात जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मांडले. यात प्रामुख्याने- एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विभाजन होऊन जळगाव धुळे नंदुरबार जिल्हयासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ तयार करण्यात यावे असा प्रस्ताव मंजुर केला होता. तो थंडबसत्यात पडला आहे. त्यावर
राहूरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खान्देश परिसरात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांच्या विषयावर खान्देशातील विविध प्रलंबित विषयांकडे एकनाथराव खडसे यांनी शासनाचे लक्ष वेधले. सदर विद्यापीठ उत्तर महाराष्ट्रात जळगाव व धुळे जिल्ह्यात कोठेही झाले तरी चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित करुन कृषी महाविद्यालयासाठी प्रलंबित पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, तेथील अन्य कामांना मदत मिळावी, अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली.

दरम्यान, १९९९ मध्ये जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी १०६ एकर जागेचे आरक्षणही करण्यात आले. मात्र नंतर हे प्रशिक्षण केंद्र जामखेडला गेले. या ठिकाणी एस.आर.पी. प्रशिक्षण केंद्र केले जाईल असे आश्वासन मिळाले होते. मात्र तेदेखील अद्याप झाले नाही. हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय असल्याची गर्जना एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत केली.

सध्या लंपी आजारामुळे जळगाव जिल्ह्यात अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील भडगाव, रावेर, मुक्ताईनगरसह अन्य तालुक्यातील जनावरांना या रोगाची लागण होऊन अनेक गुरे दगावली. यामुळे पशुपालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातही ही स्थिती असल्याने तात्काळ अनुदान मिळावे व त्यासाठी निधीची तरतूद केली जावी अशीही मागणी एकनाथराव खडसे यांनी यांनी केली.

राज्यात भूमि अभिलेख कार्यालयात पदे रिक्त आहेत. शेत मोजणीच्या कामांना विलंब होतो. या कार्यालयांमधील पदे तात्काळ भरली जावीत, तसेच प्लॉट तुकडे बंदीचा निर्णय मागे घेतला जावा यासह विविध मागण्या विधानपरिषदेत एकनाथराव खडसे यांनी केल्या.

‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२’ या विधेयकाद्वारे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. याआधी देखील अशाप्रकारचे विधेयक आणून निर्णय घेण्यात आला होता. पण त्या निर्णयाच्या अडचणी लक्षात आल्यानंतर सदर निर्णय मागे घेण्यात आला. नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवक वेगळ्या पक्षाचे असल्यामुळे नगरपरिषद किंवा नगर पंचायतीच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. भ्रष्टाचार बोकाळतो, अशी भूमिका मा. आमदार एकनाथराव खडसे यांनी या विधेयकावर विधान परिषदेत बोलताना मांडली. हा निर्णय आता जर घ्यावा लागत असेल तर आधीचा निर्णय का बदलला? त्याची कारणे काय आहेत? नगराध्यक्षाला या विधेयकाद्वारे वित्तीय अधिकार देणार आहात का? असे प्रश्न उपस्थित करुन एकनाथराव खडसे यांनी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला.

यासोबत, महाराष्ट्र आणि प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी बंद करण्यात आलेली आहे. सन २०२२-२३ चे अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे खरेदी बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. २०२३ वर्ष अजून उजाडायचे आहे. त्याआधीच कांदा खरेदी झाल्यामुळे कांद्याचे भाव उतरायला लागले आहेत. कांद्याचे भाव कमाल १४ रुपये आणि किमान ६ रुपये नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे सटाणा, मालेगाव येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहीजे, अशी मागणी आदरणीय एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली. हे आंदोलन वाढण्याची शक्यता पाहता नाफेडने कांदा खरेदी पुन्हा सुरु करावी, अशी विनंती खडसे यांनी केली. कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचा भाव द्यावा, बाजारात कांद्याला ५० रुपये भाव मिळतो आणि शेतकर्‍यांकडून मात्र ६ रुपये दराने कांदा खरेदी करायचा, हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. नाफेड कांदा खरेदी करत नसेल तर राज्य सरकारने हस्तक्षेप करुन स्वतः कांदा खरेदी करावा. शेतकर्‍यांचे आंदोलन राज्यभर पसरण्याची भीती आहे, त्यामुळे राज्य सरकारने यात त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात केली.

राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या आता होत नाहीत. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना महिना ५ हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी आमदार नाथाभाऊंनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. या संदर्भात, एकनाथराव खडसे म्हणाले की, सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहे. रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया राबवणार का? असे प्रश्न त्यांनी विचारले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन काळात एक शेतकरी आत्महत्या करण्यासाठी विधानभवनाजवळ येत असेल तर ही गंभीर बाब आहे. राज्यात चाललंय काय? असा संतप्त सवाल एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. अतिवृष्टीबाबत आम्ही सभागृहात चर्चा केली. त्यावरही सरकारकडून समाधानकारक उत्तर आलेले नाही. राज्यभरात शेती उद्ध्वस्त झाली आहे, शेतकर्‍याला जीवन जगणे कठिण झाले आहे, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍याने विधानभवनाजवळ येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, ही सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची बाब असून या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी असल्यचेही ते म्हणाले. या शेतकर्‍याच्या वडिलांनी देखील जमिनीच्या वादातून काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्राच्या गावोगावात जमिनीचे अनेक विवाद प्रलंबित आहेत. मामलेदार ऍक्टनुसर त्वरीत निर्णय घेण्याची सूचना राज्य सरकार करेल काय? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला. यावर आदरणीय एकनाथराव खडसे यांनी नुकसानग्रस्त जनतेच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे काही मागण्या मांडल्या. राज्यात पावसामुळे व पुरामुळे अनेक भागात अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाली, जनावरे वाहून गेली, वीज पुरवठा बंद पडला अशा अनेक समस्या अजूनही भेडसावत आहेत. मागील दीड महिन्यापासून जनता हवालदिल झाली असताना राज्य सरकारने खातेवाटप झाले नसल्याने सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवली. अनेक ठिकाणी मदत अजूनही पुरवली गेलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार किती दिवसात ही मदत पुरवेल याची माहिती जाहीर करण्याची मागणी नाथाभाऊंनी केली.

एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. महागाई इतकी वाढली आहे की हे निकष बाजूला ठेवून दुप्पट मदत केली तरी ती समाधानकारक नाही. यासाठी राज्य सरकारने महागाई जेवढी वाढली आहे तेवढ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पुरामध्ये एखादी व्यक्ती, जनावरे वाहून गेली तर त्यांच्या कुटुंबाला होणार्‍या मदतीमध्येही वाढ झाली पाहिजे. तसेच दरवर्षी पुराचा वेढा बसणार्‍या गावांसाठी वेगळा आराखडा तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

पावसामुळे पीकांचे नुकसान झालेय, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. उत्तर महाराष्ट्रात केळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकर्‍याला किचकट प्रक्रियेत ही मदत मिळण्यास विलंब होतो. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तरतूद पूर्वी बजेटमध्ये असायची, अलीकडे ही तरतूद कमी झालेली आहे. हे रस्ते, पूल लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी नाथाभाऊ यांनी केली आहे.

राज्यात पहिल्यांदाच सोयाबीन शेतीवर गोगलगायीचे संकट उद्भवले आहे. शेतकर्‍यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकर्‍याला बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात यावा तसेच पूर्वीचे कर्जही माफ झाले पाहिजे. यातून शेतकरी उभा राहू शकेल. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात लवकरच पालकमंत्री जाहीर करण्यात यावा, यामुळे शेतकर्‍यांना, नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी वेग येईल, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे सरकारने एका दिवसात मेट्रोसाठी आणि ठाण्यातील रस्त्यांसाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. असेच शेतकर्‍यांसाठी देखील २५ हजार कोटी जाहीर करावेत. केवळ ठाण्यामध्ये खड्डे पडलेले नाहीत, उर्वरीत महाराष्ट्रातही खड्डे पडले आहेत. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर आहे पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार, असा खोचक प्रश्न खडसे यांनी विचारला. ज्या धडाडीने हे निर्णय घेतले तीच धडाडी शेतकर्‍यांसाठी निर्णय घेतानाही दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, टीईटी घोटाळा, केंद्र सरकारमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान, स्वाईन फ्लू आजाराचा होत असलेला प्रसार, मुंबई व ठाणे शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा प्रचंड त्रास, वाहतूक कोंडी अशा विषयांवर विधान परिषदेत नाथाभाऊ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांतर्फे नियम २५९ अंतर्गत सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण मागील ४५ दिवसांत वाढले आहे. मुंबईमध्ये पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करु, अशी धमकी दिली जात आहे. सरकार अस्थिर असल्यामुळे गृह विभागाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

राज्यात वाळू माफियांनी उपद्रव माजवला असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळू माफियांना कोणाचेही भय राहिलेले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांवर एमपीडीए, मोक्का ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात रोगराई पसरली असून नवनवीन आजार उद्भवत आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही सरकारला एकनाथराव खडसे यांनी केली.

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार एकनाथराव खडसे यांनी परिवहन विभागासंदर्भात बोलताना मध्य प्रदेश सीमेवर अवजड वाहनांकडून करण्यात येत असलेल्या वसुलीबाबत प्रश्न विचारला. वक्फ बोर्डाच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून या जमिनी पुन्हा वक्फ बोर्डाकडे घ्याव्यात, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

गृह विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना ते म्हणाले की, जानेवारी २०२२ रोजी जळगाव येथे जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला. त्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला असूनही आजवर या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तसेच ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मोकळे सोडून दिले. राज्याचे मुख्यमंत्री जर गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर राज्याकडे लक्ष कोण देणार? जर ३०७ च्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोलिस लेखी माहितीवर मोकळे सोडत असतील तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे प्रतिपादन एकनाथ खडसे यांनी केले. या प्रकरणाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी चौकशी करावी आणि दोषींना शासन करावे अन्यथा जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

यासोबतच रिद्धपुरला रेल्वे स्थानक निर्माण करावे; महानुभाव पंथातील पवित्र धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकास करावा;लिळाचरित्र ग्रंथाची राज्य शासनाच्या माध्यमातून छपाई करून कमी दरात ग्रंथ सर्व सामान्यांना उपलब्धकरून द्यावाअशी मागणी आ एकनाथराव खडसे साहेब यांनी विधानपरिषदेत केली

सदैव जनतेत रममाण असणार्‍या लोकनेत्याने जनहिताच्या अशा अनेक मागण्या विधानपरिषद सभागृहात करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. नाथाभाऊंनी आजवर विधानसभा तुफान गाजविली. विधानसभेच्या इतिहासातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची नोंद आधीच झालेली आहे. हीच तडफ आता विधानपरिषदेतही दिसून येणार असून याची चुणूक पहिल्या अधिवेशनात राज्याचे पाहिली आहे. जनहितासाठी सदैव झटणारे लोकनेते माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांना आदिशक्ती मुक्ताई उदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हि मुक्ताई चरणी प्रार्थना. लोकनेते नाथाभाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. . .!

पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे

स्वीय सहाय्यक

सौ. रोहिणी ताई खडसे खेवलकर
मुक्ताईनगर

Protected Content