मारहाण करणाऱ्या पिता पुत्रांना अटक करा; राज्य कृषी सहाय्यक संघटनेची मागणी

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील गोविंद कोटेक्समध्ये कर्तव्यावर असलेले कृषि सहाय्यक कन्हैय्या महाजन यांना शेंदुर्णी येथील गोविंद अग्रवाल, नितिन अग्रवाल, निलेश अग्रवाल यांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी मारहाण केली होती; त्या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परंतु आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्या विषयी आज दिनांक १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जळगांव जिल्हा शाखेकडून मा.जिल्हाधिकारी जळगांव यांना निवेदन देण्यात आले असून

सदर निवेदनाद्वारे “शेंदुर्णी येथे कर्तव्यावर असताना कृषि सहाय्यक कन्हैय्या महाजन यांना शासकीय कामात सहकार्य करायचे सोडून  गोविंद कोटेक्सचे मालक गोविंद अग्रवाल व त्यांचे दोन्हीं मुले नितिन अग्रवाल, निलेश अग्रवाल यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या संदर्भात  पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश आपले स्तरावरून पोलीस प्रशासनास द्यावे अन्यथा न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करावे लागेल. संघटना सदर दुष्कृत्यांचा निषेध करण्यासाठी दिनांक १ व २ सप्टेंबर रोजी काळया फिती लावून काम करणार आहे.” असे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषि आयुक्त पुणे, विभागीय आयुक्त नाशिक, कृषि सह संचालक नाशिक, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव, जिल्हा कृषी अधीक्षक जळगांव यांना देण्यात आल्या आहेत. तत्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content