Home राजकीय एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूतकाळाविषयी मोठा दावा करत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. संजय राऊत यांनी दावा केला आहे की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. अहमद पटेल आणि शिंदे यांच्यात पहाटेच्या वेळी महत्त्वाची चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला. मात्र, आता अहमद पटेल हयात नसल्याने याविषयी फारशी चर्चा करायची नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. “यासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले. संजय राऊत काय म्हणाले हेही आपण ऐकले नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत यांनी काल पिलेली भांग अद्याप उतरलेली नाही. ते रोजच सकाळी भांग पिऊन नको त्या गप्पा मारत असतात,” असा घणाघात त्यांनी केला. “जर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, तर तुम्ही त्यांना नेता का बनवले? त्यांना नगरविकास मंत्री का केले?” असा सवालही म्हस्के यांनी विचारला आहे. म्हस्के पुढे म्हणाले, “संजय राऊत यांना नगरसेवकाचे तिकीट मिळण्यासाठीही कोणी विचारणार नाही. जर अहमद पटेल यांनी शिंदे यांना ऑफर दिली असेल, तर ती त्यांच्या योग्यता पाहूनच दिली गेली असणार.”

या संपूर्ण वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संतुलित भूमिका घेतली आहे. “एकनाथ शिंदे यांचा महायुती सरकार स्थापनेत मोठा वाटा आहे, हे मान्य करावे लागेल. मात्र, सध्या सरकारमध्ये त्यांना महत्त्व दिले जात नसल्याची चर्चा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून ते समाधानी नसल्याचे दिसते. मात्र, संजय राऊत यांच्या दाव्याला कोणता आधार आहे, हे सांगता येणार नाही. भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास आणि त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, राऊत यांच्या या दाव्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound