मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘आपण बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आयुष्यभर वाटचाल करत आहोत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच आपण वेगळा मार्ग निवडायला हवा होता !’, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह सहकार्यांच्या मनातील खदखद ही जुनी असल्याचे सांगितले. रात्री दीड वाजता आमदार संजय शिरसाठ यांच्या पदाधिकार्यांतर्फे आयोजीत सत्कारात ते बोलत होते.
रवींद्र नाट्यमंदिरात रात्री दीड वाजता आमदार संजय शिरसाठ यांच्या समर्थकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहा महिन्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून आले. शिवसैनिक वार्यावर होता, त्यांचे कुणी ऐकत नव्हते. अनेक सहकार्यांनी तेव्हाच व्यथा कानावर घातल्या. बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. बाळासाहेब हे नेहमी सांगायचे जेव्हा शिवसेनेची कॉंग्रेस होईल तेव्हा पक्ष बंद करून टाकू. नेमकी हीच स्थिती येत असल्याचे पाहून आम्ही उठाव केला. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचे काम करत असतांना आम्ही गुन्हेगार कसे ? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. तर, लोकांना धर्मवीर चित्रपट आवडला असला तरी तो काहींना आवडला नसल्याचा टोला देखील मारला.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सत्तांतराच्या थरारक काळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आसाम सरकारने आमची चांगली काळजी घेतली. यात शहाजी बापू पाटील हे तर आपल्या डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रिय झालेत. आम्ही त्यांच्यातील कलागुण जगासमोर आणल्याची मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. तर या १५ दिवसांमधील घटनांवर एखादा चित्रपट देखील तयार होऊ शकतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.