मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन केंद्रीय मंत्रीपदे मिळणार असून यासोबत त्यांनी राज्यपालपदाचीही मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दोन सदस्यांना स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली असून याबाबत टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, शिंदे गटाला दोन मंत्रीपदांसोबतच दोन राज्यपाल पदे देखील मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे ही मागणी केली आहे. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले गजानन किर्तीकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरे नाव अद्यापही समोर आलेले नाही. तथापि, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव स्पर्धेत असल्याचे मानले जात आहे. याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.