मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून बाहेर गेलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे अखेर मुंबईत दाखल झाले असून उद्यापासून सुरू होणार्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात त्यांची हजेरी असणार आहे.
सोमवार, दि. २० जून रोजी सायंकाळी उशीरा विधानपरिषदेचा निकाल लागला. यात कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. यानंतर रात्री उशीरा एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सुरतला पोहचल्याची बातमी आल्याने राज्यात राजकीय भूकंप आला. यथावकाश शिंदे गटाचा आकडा वाढला. यातून ठाकरे सरकार पडून परवा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून मुंबईत येत असले तरी त्यांच्या गटाचे आमदार हे अद्यापही मुंबईत आले नव्हते. या पार्श्वभूमिवर, आज रात्री आठ वाजेच्या सुमारास या गटाचे सर्वच्या सर्व ५० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहे. या आमदारांची भाजपच्या गटासोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेणार आहेत. तर उद्यापासून सुरू होणार्या विधीमंडळाच्या अधिवेशनात ते हजेरी लावणार आहेत.