मुक्ताईनगर विशेष प्रतिनिधी । आपल्या आजवरच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत जनतेने दिलेले सहकार्य रोहिणीताई यांनाही द्यावे असे भावनिक आवाहन आज एकनाथराव खडसे यांनी केले. या माध्यमातून त्यांनी आजवर सुरू असणार्या तर्क-वितर्कांना विराम दिला.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याऐवजी भाजपने आज त्यांची कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमिवर, नाथाभाऊ नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमिवर, आ. खडसे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या आजवरच्या चाळीस वर्षांच्या वाटचालीसाठी सहकार्य करणार्यांचे आभार व्यक्त केले. आपण आजवर पक्षाच्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन केल्याचे सांगत आतादेखील पक्षाचा निर्णय स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. अगदी मंत्रीपद सोडण्याचे आदेशदेखील आपण स्वीकारले. आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असून हा निर्णयदेखील स्वीकारत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवल्या आहेत. रोहिणीताई या माझी मुलगी म्हणून नव्हे तर भाजपसाठी आजवर केलेले काम लक्षात घेता त्यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम करायचे असल्याचे ते म्हणाले. रोहिणीताईंना निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
खडसे पुढे म्हणाले की, उमेदवारीसाठी विलंब लागला असला तरी आता पक्षाने आपला निर्णय घेतला असून याचे पालन करायचे आहे. रोहिणीताई या युवा असून त्यांना सहकारात काम करण्याचा अनुभव आहे. यामुळे सर्वांनी एकजुटीने एकदिलाने परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीनंतर रोहिणीताई खडसे या अर्ज भरणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.
याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे व रोहिणी खडसे उपस्थित होत्या.