जळगाव, जितेंद्र कोतवाल Exclusive | आज एकीकडे ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जावयांना अटक करून त्यांच्या भोवती पाश आवळला असतांना दुसरीकडे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. याच कृपाशंकर यांनी मनीष भंगाळे हा कथित हॅकर व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट करून दिली होती. यामुळे जवळपास पाच वर्षात खडसे विरूध्दच्या षडयंत्राचे एक वर्तुळ आजच्याच दिवशी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
एकनाथराव खडसे यांना २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एका कनिष्ठ सहकार्याला ही संधी दिल्यामुळे ते दुखावले होते. अर्थात, पक्षाने महसूलसह तब्बल १२ खात्यांचे मंत्रीपद देऊनही मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल ते वारंवार जाहीरपणे बोलून दाखवत असत. यामुळे फडणवीस आणि त्यांच्यातील दरी वाढत गेली. अर्थात, असे असले तरी फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील सर्वात बलाढ्य मंत्री म्हणून त्यांची ओळख कायम होती.
दरम्यान, मे २०१६ च्या मध्यापासून त्यांच्यावर लागोपाठ अनेक आरोप करण्यात आले. https://livetrends.news यात प्रामुख्याने भोसरी येथील जमीन घोटाळ्याचा आरोप झाला. याच आरोपातून आता त्यांचे जावई ईडीच्या ताब्यात गेले आहेत. यासोबत खडसे यांच्या कथित पीएने लाच मागितल्याचे प्रकरणही गाजले. या सर्व गदारोळात मनीष भंगाळे या कथित इथीकल हॅकरने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. एकनाथ खडसे यांचे दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंध असून त्यांनी दाऊदच्या पत्नीशी बोलणे केल्याचा आरोप करून भंगाळे याने खळबळ उडवून दिली. या आरोपांमुळे अवघ्या पंधरवाड्यात म्हणजेच ३ जून २०१६ रोजी एकनाथराव खडसे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यातील विविध आरोपांमधून एकनाथराव खडसे यांना क्लीन चीट मिळाली. मात्र दाऊदशी संबंधांच्या आरोपांमुळे खडसे प्रचंड दुखावले गेले. https://livetrends.news त्यांनी या प्रकरणी खासगी डिटेक्टीव्ह एजन्सीज लाऊन चौकशी केली. यात माजी गृहराज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग हे मनीष भंगाळे याला घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री दीड वाजता भेटल्याची बाब समोर आली. याचे फोटो देखील समोर आले. खरं तर कृपाशंकर सिंग आणि खडसे यांच्यात कोणतेही वितुष्ट नसतांना त्यांनी या प्रकरणात रस का घेतला हे अनेकांना कोडे पडले. स्वत: सिंह यांनी या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसून भंगाळे हा आपल्याकडे आल्याने आपण त्याला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
मात्र यामागे नेमके काय असावे याची चुणूक लवकरच दिसून आली. कृपाशंकर सिंह यांच्या विरूध्द आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. फडणवीस सरकारने याबाबत ताठर भूमिका न घेतल्याने त्यांची या सर्व प्रकरणांमधून मुक्तता झाली. तर, मनीष भंगाळेची एटीएसने कसून चौकशी केल्यानंतर तो खोटे बोलल्याचे दिसून आले. यामुळे त्याला मध्यंतरी तरूंगाची हवा देखील खावी लागली होती. अर्थात मनीष भंगाळे याने लावलेले आरोप खोटे असल्याचे कोर्टाने मान्य केले.
दरम्यान, कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसचे मुंबईतील मातब्बर नेते असले तरी ते अडगळीत पडत गेले. गेल्या काही महिन्यांपासून ते फारसे सक्रीय देखील नव्हते. आज एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक झाली असून खुद्द त्यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई येथील कार्यक्रमात कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृपाशंकर यांचे स्वागत केले. आता खडसेंवरील आपत्ती आणि कृपाशंकर यांचा भाजपमधील प्रवेश हा एकाच दिवशी व्हावा हा अफलातून योगायोग जमून आला आहे. अर्थात, फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचा वापर करून खडसेंचा गेम केला होता हे देखील यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे.