मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातोड शिवारातील भूखंडातून अवैध उत्खनन केल्या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय गोत्यात सापडले असून तहसीलदारांनी मोठ्या दंडाची नोटीस ठोठावल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या सातोड शिवारातील जमीनीतून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करतांना या माध्यमातून तब्बल चारशे कोटी रूपयांच्या गौणखनिजाचे उत्खनन करून ते महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपावर महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली होती. या एसआयटीने चौकशी करून प्रत्यक्ष उत्खनन किती केले ? याचे मापन केले होते.
एसआयटीच्या रिपोर्टनंतर मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली. यात त्यानुसार अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी एक लाख १२ हजार ११७ इतके दाखविण्यात आली असून नियमानुसार याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयाचा दंड आकारण्याबाबत ही नोटीस बजावलेली आहे. यात आमदार एकनाथ खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे व रोहिणी खडसे, रक्षा खडसे यांच्यासह इतर जमीन मालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाले आहे.