जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सोनी नगरच्या नागरिकांनी एकजुटीने येऊन स्वयंभू महादेव मंदिराचा विकास करावा असे ह.भ.प.देवदत्त मोरदे महाराज यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. सोनी नगरात महाशिवरात्रि निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढतांना विष बाहेर पडल्यानंतर देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरल्याने यावर तोडगा म्हणून महादेवाने सगळे विष पिऊन मोठी समस्या सोडविले. महादेवाचे गुणगान गायल्याने या रात्रीला महाशिवरात्रि म्हणतात. पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोड जवळील सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने विविध कार्यक्रम पार पाडले.
पुढे देवदत्त महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातुन प्रबोधन करतांना सांगितले की, महाशिवरात्रि वर्षातून एकदा येणारा महत्वाचा प्रसंग आहे. महादेवाचे स्थान कुठे असते याचे महत्व भाविकांना पटवून दिले.
सोनी नगरातील महादेव मंदिराची दुर्दशा फारच बिकट असून येत्या वर्षात मंदिराचा विकास एकजुटीने करण्यात यावा असे महाराजांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले.
मंदिरात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यत वकील सुरेंद्र काबरा व निशा काबरा यांच्यासह विजय चव्हाण, नारायण येवले, पंकज राजपूत, मधुसूदन नागला समाधान ठाकरे, निलेश जोशी, सत्यजित कंखरे या 8 जोडप्यासहित रुद्र अभिषेक व हवन पूजा चेतन कपोले महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यानंतर दुपारी 12 वाजता महादेवाची आरती करण्यात आली.
तर दुपारी 3 ते 6 वाजेच्या सुमारास शहरातील सुप्रसिद्ध श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी यांचा विविध भजनांचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात भाविकांनी तल्लीन होत सहभाग घेतल्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी 6 वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर रात्री 9 वाजता ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी सोनू महाराज, अरुण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शंकर महाराज यांनी कीर्तनाला साथ दिली.
या विविध कार्यक्रमाला सोनी नगर, गणपती नगर,प्रल्हाद नगर, मयूर कॉलनी, पिंप्राळा परिसरातील शिवभक्त उपस्थित होते.