अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्हयातील बोरगाव मंजू येथे विरूध्द दिशेने येणाऱ्या गोवंश वाहून नेणाऱ्या मालवाहू गाडीने समोरच्या गाडीला धडक दिली. घटनास्थळावरून पसार होत असताना या वाहनाचा पाठलाग करून गोवंश वाहून येणाऱ्या मालवाहू गाडीला थांबवले असता त्या गाडीमध्ये आठ बैल दिसून आले. ही घटना रविवारी १९ मे रोजी सकाळी घडली आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून बैलांना जीवदान दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, बोरगाव मंजू येथील प्रवासी बोलोरो गाडी क्रमांक एमएच ३० पी ९२४१ ही जात होती. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गोवंश वाहून नेणारी गाडी क्रमांक एमएच ३० बीडी ३७३९ ही अकोल्याकडे जात होती. या गाडीने समोरच्या प्रवासी गाडीला धडक दिली व घटनास्थळावरून पसार होत असताना प्रवासी गाडी चालकाने पाठलाग करत ढगा फाट्यावर पकडले. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत वाहनांची पाहणी केली असता मालवाहू गाडी क्रमांक एमएच ३० बीडी ३७३९ या गाडीतून अवैधरित्या विनापरवाना निर्दयतेने आठ बैलांना कोंबून कत्तलीकरता नेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यासंदर्भात शेख समीर, त्याचा साथीदार शेख रहेमान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.