Home Cities रावेर “आजची युवती आणि संघर्ष” या विषयावर मुलींना प्रभावी मार्गदर्शन

“आजची युवती आणि संघर्ष” या विषयावर मुलींना प्रभावी मार्गदर्शन


सावदा– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथे तापी परिसर विद्या मंडळाच्या वतीने “आजची युवती आणि संघर्ष” या विषयावर विशाखा समिती अंतर्गत एक प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. २१ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात युवतींना त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संघर्षांबद्दल जागरूक करत त्यावर मात करण्याचे उपाय सुस्पष्टपणे मांडण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कनिष्ठ उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. डॉ. सीमा बारी यांनी आपल्या सुस्पष्ट आणि संवेदनशील भाषणात आजच्या तरुणीच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणारी आजची युवती एकीकडे यशाच्या शिखराकडे झेपावते आहे, तर दुसरीकडे समाज, शरीर, मन आणि संस्कार यांच्या दडपणात संघर्ष करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

विशेषतः किशोरवयीन मुलींना येणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मानसिक गोंधळ, आहारातील दुर्लक्ष, चिडचिडेपणा आणि सामाजिक अपेक्षांचा ताण कसा त्रासदायक ठरतो, हे त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने स्पष्ट केले. या संघर्षावर उपाय म्हणून त्यांनी योग, प्राणायाम, शारीरिक क्रियाशीलता, योग्य आहार, नीट झोप आणि सशक्त मानसिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्याबरोबरच सामाजिक संवाद वाढवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयश्री सरोदे (विशाखा समिती प्रमुख) यांनी केले. सूत्रसंचालन कु. तुलसी महाजन हिने केले आणि आभार प्रदर्शन प्रा. अर्चना वराडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उत्पल चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रा. तिलोत्तमा चौधरी, प्रा. कविता भारुडे, प्रा. पूनम कोल्हे आणि प्रा. स्नेहल देशमुख यांसह सर्व शिक्षकवर्गाने संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना त्यांच्या जीवनातील संघर्षांची जाणीव होऊन त्यावर योग्य प्रकारे मात करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला आहे. विद्यार्थिनींच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांना योग्य दिशा मिळाल्याचे त्यांच्या प्रतिक्रिया दर्शवतात.


Protected Content

Play sound