जळगाव प्रतिनिधी । शिक्षक बदली प्रकरणातील कथित लाच प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी केली नसल्याचा लेखी खुलासा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी केला आहे.
शिक्षकांनी बदलीसाठी दिलेली लाच शिक्षणाधिकार्यांकडून परत मिळवून दिल्याचा दावा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. मात्र, या कथित लाचप्रकरणात अशा कोणत्याही मध्यस्थीचा प्रश्नच नसल्याचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी बुधवारी चौकशी अधिकार्यांकडे लेखी खुलाशामध्ये स्पष्ट केले.
यात त्यांनी म्हटले आहे की, संबंधित शिक्षकांची बदली ही १८ जुलै २०१९ रोजीच्या न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. या प्रकरणात आपण लाच घेतलेली नाही. त्यातील एकाही शिक्षकाने तशी कोणाकडेही तक्रार केलेली नाही. त्यामुळे कुणी यात मध्यस्थी करण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे. २० ऑक्टोबर रोजी चौकशीमध्ये त्या तीन शिक्षकांनी आमदारांशी संपर्क झाल्याचे नाकारले होते. आता त्यांच्यापाठोपाठ शिक्षणाधिकार्यांनीदेखील आमदार चव्हाणांचा दावा खोडून काढला.