नागपूर । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या पथकाने छापे मारले आहेत. यासोबत त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या घरीही धाडी टाकण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता.