बंद घरात चोरट्यांचा डल्ला; दागिन्यांसह रोकड लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी । विवाहासाठी दुसर्‍या शहरात गेलेल्या अग्रवाल परिवाराच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून दागिने आणि रोकड असा एकूण तब्बल ७ लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील जय बाबाजी चौकातील चामुंडा माता मंदिराच्या पाठीमागे कपिल दुर्गाप्रसाद अग्रवाल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. एका इमारतीत खालील मजल्यावर त्यांचे बंधू तर पहिल्या मजल्यावर कपिल अग्रवाल हे राहतात. दिनांक २३ जून रोजी सकाळी ते आपली पत्नी, आई आणि मुलांसह अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नात्यातील विवाहासाठी गेले होते.

दरम्यान, आज पहाटे चार वाजता अग्रवाल कुटुंब हे विवाह सोहळ्यावरून परत आले असता त्यांना बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. यात कपाटातील दागिने आणि यातील रोकड रक्कम लंपास झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी सामान तपासून पाहिला असता, विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आणि रोख साडे चार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याचे त्यांना दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सुमारे ७ लाख ३७ हजार पाचशे रूपयांची लुट केल्याचे निष्पन्न झाले.

कपिल अग्रवाल यांनी तळ मजल्यावर राहणारे त्यांचे मोठे बंधू प्रकाश यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना काल रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान वरील मजल्यावर जड वस्तू पडल्याचा आणि कुणी तरी चालत असल्याचा आवाज आला. मात्र त्यांनी घाबरून याबाबत कुणाला माहिती दिली नाही.

या संदर्भात कपिल अग्रवाल यांनी आज पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरूध्द भादंवि कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सैयद आणि त्यांचे सहकारी करत आहेत. इतक्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content