पुणे प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशातील उद्योग आपल्याकडे येत आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत केली.
देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली असून भाजप सरकारच्या कार्यशैलीवर निशाणा साधला आहे. यावेळी पियुष गोयल म्हणाले की, ‘मनमोहन सिंग यांच्या काळात सर्व सामान्य नागरिक आणि उद्योग व्यावसायिकांचा कधीही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे असंख्य तरुणाच्या हातचा रोजगार गेला, शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या. तसेच याच सरकारच्या काळात चारा, कोळसा, सिंचन, आदर्श हे यासह अनेक घोटाळे देशभरात झाले. यामुळे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था कोलमडली. हे सर्व होत असताना, मनमोहन सिंग यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यावर भर दिल्याचं पहायला मिळाले आहे. जर वेळीच मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई केली असती, तर आज हे दिवस त्यांना पाहावे लागले नसते. त्यामुळे आमच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा, तुमच्या सरकारमध्ये तुम्ही काय केले त्यावर बोला’, अश्या शब्दात गोयल यांनी सिंग यांच्यावर टीका केली.
सध्या रेल्वेचे खासगीकरण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर ते म्हणाले की, ‘रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. राज्यातील अनेक भागातील स्टेशनवर आधुनिक यंत्रणा अद्यावत करण्यात आल्या आहे. कामगारांच्या दृष्टीने अधिकाधिक निर्णय घेतले जात असून ज्या काही खासगीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.