मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत पर्यावरणपूरक होळीचे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून होळी या सणाचे वैशिष्ट्य व्यक्त करताना आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांना होळीत जाळून टाकून चांगल्या विचारांचा व चांगल्या कृतीचा शिमगा करा असे आवाहन केले.
तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले भूगोल विभाग प्रमुख प्रा. पी. पी. लढे यांनी आपल्या मनोगतातून होळीचे पौराणिक महत्त्व तसेच आधुनिक काळात रंगपंचमीमध्ये झालेला बदल याबद्दल मार्गदर्शन करताना होळी मध्ये होणाऱ्या पाण्याचा अपव्यय याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. ए. व्ही. वाकोडे यांनी केले त्यात त्यांनी रासायनिक रंगाचे मानवावर व पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम तसेच नैसर्गिक रंगाचे फायदे विशद करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रंग कसे तयार करावे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच प्रातिनिधिक स्वरूपात नैसर्गिक रंगाचे वाटप महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता कपले हिने केले तर आभार प्रदर्शन राजनंदिनी चौधरी हिने केले. सदर कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. ए. पी.पाटील व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ.एस. ए.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.डॉ. आर.डी.येवले, प्रा. नितीन हुसे व शिक्षकेत्तर कर्मचारी विनायक राणे व तृतीय वर्ष वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.