Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी; विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी; विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन यंदाची होळी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वच्छता, पाण्याची बचत आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी एकत्र येत परिसरातील झाडांची सुकलेली पाने गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली. परिसर स्वच्छ करताना गोळा झालेल्या सुकलेल्या पानांचा उपयोग करून होळीचे दहन करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे साहित्य न वापरता पारंपरिक पद्धतीने आणि निसर्गपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते होळीचे पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी पारंपारिक सण साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली. संत गाडगेबाबा आणि महर्षी कर्वे यांनी नेहमीच स्वच्छतेचा संदेश दिला असून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेमुळे रोगराई पसरत नाही आणि आरोग्य सुरक्षित राहते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळत कोरड्या रंगांचा वापर करून होळी खेळली. पाण्याचा वापर न करता सण साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे केल्यास निसर्गाचे नुकसान टाळता येते आणि समाजात सकारात्मक संदेशही पोहोचतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 


Protected Content

Play sound