
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत इको-फ्रेंडली होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा संदेश देण्यात आला.

महाविद्यालयाच्या आवारात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील झाडांची सुकलेली पाने गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रमही हाती घेतला. स्वच्छता करत गोळा करण्यात आलेल्या सुकलेल्या पानांची होळी करून पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचे दहन करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह स्वच्छतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा आणि त्यामागील सामाजिक संदेश यावर प्रकाश टाकला. महर्षी कर्वे आणि संत गाडगेबाबा यांनी नेहमीच स्वच्छतेचा संदेश दिला असून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास अनेक रोगराईपासून बचाव होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. तसेच युवा पिढीने सोशल मीडियाच्या अतिरेकापासून दूर राहून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळत कोरड्या रंगांचा वापर करून होळीचा आनंद साजरा केला. सण साजरा करताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी पाण्याचा वापर टाळून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे केल्यास निसर्गाचे नुकसान टाळता येते तसेच आरोग्यालाही कोणताही धोका निर्माण होत नाही, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून सामाजिक जबाबदारीची जाणीवही वाढीस लागली आहे. पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची संस्कृती रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.



