चाळीसगाव (प्रतिनिधी) पावसाळ्यात लहान मुलांमध्ये जुलाब ,उलटी,डायरिया,गँस्ट्रो,न्युमोनिया यासारखे आजार अधिक प्रमाणात आढळून येतात.आणि हे आजार प्रामुख्याने अस्वच्छ हात,दुषीत पाणी यामुळे होत असून यामुळे प्रसंगी मुलांच्या जिवाला धोका होवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातूनच स्वच्छतेचे महत्त्व समजून तशी वैयक्तिक काळजी घेतली पाहीजे, असा सल्ला डॉ.विनोद कोतकर यांनी दिला. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभोणे तांडे येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना “हात धुणे” याबाबतीत अतिशय हसत-खेळत प्रात्यक्षिक करुन दाखवून डॉ.कोतकर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून हात धुण्यासाठीची कृती करवून घेतली. आई फाऊंडेशनच्या वतीने सुधीर चव्हाण यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी शालेय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी ग्रा.पं.सदस्य रोहिदास राठोड,पाणी फाऊंडेशनचे राहूल राठोड,संदिप राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक उमेश चव्हाण यांनी केले तर आभार मुख्याध्यापक एस्.आर.सोनवणे यांनी केले.