चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वैजापूर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी पाणी पिल्यामुळे तब्येत खराब झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आश्रम शाळेतल्या मनीषा पावरा (वय-१०), रतीला बारेला (वय-०५), रोशनी बारेला (वय-१०),पूजा बारेला (वय-१५), मोनिका पावरा (वय-१८), रविना पावरा (वय-१७), संगीता भिलाल (वय-१८) या सात विद्यार्थिनीची तब्येत बिघडल्यामूळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. यावेळी येथील डॉकटर उपलब्ध नसल्यामुळे चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात संध्याकाळी 7 वाजता त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विकास माळी यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, १७ जून पासून शाळेतील पाण्याची बोर बंद पडली आहे. बोअरवेल दुरुस्तीकरिता २० हजार रुपये खर्च करून देखील बोर सुरू न झाल्यामुळे शाळेला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. वस्तीगृह अधिक्षक ह्या दोन दिवसापासून शासकीय कामाकरीता यावल प्रकल्प कार्यालयात गेल्या असल्याकारणाने त्यांना शाळेतील शिक्षकांनी व कर्मचारी यांनी रुग्णालयात दाखल केले. प्रकल्प कार्यालयाच्या मीटिंगमध्ये विषय मांडून सुद्धा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. नेहमी प्रमाणे प्रकल्प अधिकारी यांनी भ्रमणध्वनी उचलत नसल्यामुळे त्यांचे यावर मत सांगता येत नाही नसल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.