पाणीपुरवठा न झाल्याने लासलगावकरांनी दिली बंदची हाक

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लासलगावमध्ये भीषण पाणीटंचाई असल्याने लासलगावकरांनी ११ मे रोजी आज बंदची हाक दिली आहे. या बंदच्या हाकेला लासलगावातील ग्रामस्थांनी उत्फूर्ती प्रतिसाद दिल्याने लासलगावमध्ये बंद पाळण्यात आला आहे. लासलगावमध्ये मागील २० दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. याव्यतिरिक्त लोकसभा निवडणूकीच्या मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा इशारा लासलगावकारांनी प्रशासनाला दिला आहे.

लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम व शाखा अभियंता पी. एस. पाटील यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक ९ मे रोजी पार पाडली. या झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. ही योजना एमजीपीने चालवण्यास घ्यावी या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करावी. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी हमी द्यावी व पाणीपुरवठा योजनेचे सोलर पॅनल तत्काळ सुरू करावे, असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले होते. मात्र, यात कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी नागरिकांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने बंद ठेऊन लासलगावकरांनी कडकडीत बंद पाळला. या प्रश्नी जोपर्यंत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालत नाही तोपर्यंत लोकसभा मतदानावर बहिष्कार निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.

Protected Content