जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, याचा अनुभव रविवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाच्या अगदी समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना आला. मद्यपान करून आलेल्या एका व्यक्तीने भर रस्त्यात झोपून आणि गोंधळ घालून अक्षरशः धिंगाणा घातला. या प्रकारामुळे बस स्थानक परिसरातून जाणारी वाहतूक विस्कळीत झाली, तसेच अनेक मोठे अपघात होता होता टळले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची माहिती नजीकच्या पोलिसांना देऊनही कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नवीन बस स्थानक या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा मद्यपी वारंवार रस्त्याच्या मधोमध येऊन झोपत होता. यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले. भरधाव येणाऱ्या तीन ते चार वाहनधारकांनी प्रसंगावधान राखून आपले अपघात थोडक्यात टाळले.

रस्त्यावरचा धोका लक्षात घेऊन काही जागरूक नागरिकांनी या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला बाजूला नेऊन बसवले, परंतु तो पुन्हा रस्त्यात येऊन गोंधळ घालत होता. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, नागरिकांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला तसेच समोर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांना देखील कळविण्यात आले होते. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अगदी जवळ असूनही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदतीसाठी कोणीही पोहोचले नाही.
बस स्थानकाजवळ हा प्रकार घडल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे त्यांची धावपळ झाली. रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या या व्यक्तीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही, पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने जळगावातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अखेर, स्थानिक नागरिकांच्या मदतीने व प्रयत्नाने सदर मद्यपीला रस्त्याच्या कडेला करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत झाली. पोलिसांच्या या अनास्थेबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.



