
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा उत्साह वाढत असतानाच, मानवी जीवनासाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने युध्दपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. यंदा केवळ दुकानांवरच नाही, तर मैदानांवर पतंग उडवणाऱ्यांवरही ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १ जानेवारी रोजी दिली.

विक्रेत्यांचे धाबे दणाणले:
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत जळगाव शहर, एम.आय.डी.सी., यावल आणि पारोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सुमारे ३९ हजार ४०० रुपये किमतीचा अवैध नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. छुप्या पद्धतीने साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
मैदानांवर ड्रोनची गस्त:
यंदा तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरातील मोकळी मैदाने, घरांच्या गच्ची आणि गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोन फिरवून छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. ड्रोनमध्ये कैद होणाऱ्या दृश्यांच्या आधारे संबंधित पतंगबाजांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
नायलॉन मांजा हा अविघटनशील असून तो गळ्याला किंवा शरीराला लागल्यास गंभीर इजा किंवा मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सणाचा आनंद लुटताना पारंपारिक सुती दोरा वापर करावा. आपल्या एका आनंदापोटी कोणाचा जीव धोक्यात येऊ नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.



