

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयाच्या अंतर्गत अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा नुकतीच शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी रोटरी हॉल, पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेर येथे संपन्न झाली. शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ आणि पीबीए इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत तालुक्यातील १० शाळांनी सहभाग नोंदवला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि उपयोग याविषयी सखोल माहिती दिली. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. रमेश माने (मराठी विभागप्रमुख, प्रताप महाविद्यालय) आणि प्रा. ज्ञानेश्वर पाटील (नाट्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय) यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाला पीबीए इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, डी.आर. कन्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा बाविस्कर, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, तसेच नंदा पाटील, भाग्यश्री वानखेडे, सोपान भवरे, दिनेश पालवे, माधुरी पाटील, स्वाती माळी, श्वेता पवार, संजय पाटील, प्राजक्ता शिंदे, एन. डी. पाटील, वैशाली पाटील, आकाश पाटील आणि संदीप शिरसाठ यांच्यासह अनेक विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीबीए इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, संचालक मंडळ, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, रोटरी क्लब अमळनेरचे चेअरमन आणि सर्व रोटरीयन यांचे विशेष सहकार्य लाभले.
या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील काजल योगेश गुरव व तिच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकावला. विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर येथील देवेंद्र कमलाकर पाटील व समूहाला द्वितीय क्रमांक मिळाला तर पं. नेहरू माध्यमिक विद्यालय, फाफोरे येथील स्वाती प्रताप पाटील व समूहाला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ क्रमांक साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथील तपन प्रकाश पाटील व समूह आणि पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेर येथील नित्या गणेश पाटील व समूह यांना देण्यात आला. जिल्हास्तर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कळमसरे येथील शाळेचे नाट्य सादर केले जाणार आहे.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मनोगते घेण्यात आली. यावेळी इंस्पायर अवॉर्डसाठी निवड झालेल्या टाकरखेडा येथील विद्यार्थिनी धनश्री योगेश पाटील हिचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. परीक्षक प्रा. डॉ. रमेश माने यांनी निकाल जाहीर करण्याआधी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांच्या सखोलता आणि त्यांच्या नाट्याशी असलेल्या नात्याबाबत सप्रमाण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नंदा पाटील यांनी मानले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागाचे प्रमोद पाटील, देवेंद्र पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.



