Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जीव वाचवणारी ‘गोल्डन अवर’ कामगिरी  

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जीव वाचवणारी ‘गोल्डन अवर’ कामगिरी  


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ‘गोल्डन अवर’ किती महत्त्वाचा असतो, याचे जिवंत उदाहरण जळगावात पाहायला मिळाले. मलकापूर येथील ६५ वर्षीय वृद्ध रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अवघ्या तासाभरात यशस्वी एन्जीओप्लास्टी करून त्यांचे प्राण वाचवले. या जलद आणि अचूक उपचारामुळे रुग्णालयाच्या यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील संबंधित वृद्ध शेतकरी यांना २६ तारखेला दुपारच्या सुमारास अचानक छातीत वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, प्रवासादरम्यानच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेताच रुग्णालयाची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना हृदयालयात हलवून टुडी इको आणि एन्जीओग्राफी करण्यात आली. या तपासणीत मुख्य रक्तवाहिनी तब्बल ९५ टक्के ब्लॉक असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांशी चर्चा करून तातडीने एन्जीओप्लास्टी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. झिशान सय्यद, डॉ. सिद्धेश्वर खांडे, डॉ. हर्ष पटेल आणि डॉ. सई पाटील या तज्ज्ञ टीमने अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली आणि उपचार यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला.

रुग्णालयाच्या तत्परतेमुळे आणि तासाभरात पूर्ण झालेल्या वैद्यकीय प्रक्रियेमुळे रुग्णाचा जीव वाचल्याची माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांसाठी वेळेवर उपचार किती महत्त्वाचे असतात, यावर त्यांनी भर दिला. या संपूर्ण प्रक्रियेत हृदयालयातील वैद्यकीय कर्मचारी व सहकाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound