जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये रॅगींगविरोधी जागरूकता वाढवण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने अनोखी पुढाकार घेत अॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक थेट मेसमध्ये आयोजित केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बुधवार, दि. ६ मे रोजी महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम मेसमध्ये अॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक अध्यक्ष तथा डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, नशिराबाद पोलिस विभागाचे अतुल महाजन, डॉ. प्रेमचंद पंडीत, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, चेतन साखरे, ललित बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कमिटीच्या सदस्यांनी मेसमध्ये भोजनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मेसमधील वातावरण कसे असावे, रॅगींगविरोधी नियमांचे पालन कसे करावे आणि सुरक्षित, सकारात्मक वातावरण कसे राखावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कमिटी सदस्यांनी विद्यार्थ्यांसमवेतच भोजन घेत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि सूचनाही जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून संबंधितांना तातडीने सूचना देण्यात आल्या. अशा प्रकारे मेसमध्येच बैठक घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांशी अधिक जवळीक साधण्यासाठी आणि त्यांना मोकळेपणाने आपले विचार मांडता यावेत, यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हा उपक्रम महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिनव ठरला असून, रॅगींगविरोधी मोहिमेला अधिक बळकटी देणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून यशस्वी होत असल्याचे दिसून आले.



