Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्यविषयक व्याख्यान

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्यविषयक व्याख्यान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘इंडियन सोसायटी ऑफ लाइफस्टाइल मेडिसिन (ISLM)’ आणि ‘फिजिशियन कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी एका महत्त्वाच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. “असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारामध्ये पोषणाची भूमिका” या विषयावर जागतिक स्तरावरील आहारतज्ञ डॉ. झिशान अली (वॉशिंग्टन, अमेरिका) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळुंके, डॉ. एन.एस. आर्वीकर आणि डॉ. दिलीप ढेकळे यांनी शाल-श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. झिशान अली यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या जुनाट व संसर्गजन्य नसलेल्या आजारांवर पूर्ण शाकाहार (Whole Plant-Based Diet) हा रामबाण उपाय आहे. जेवणात तेल, साखर, दुग्धजन्य पदार्थ आणि प्राण्यांपासून निर्मित कोणतेही पदार्थ पूर्णपणे टाळल्यास आरोग्य उत्तम राहते. तसेच, कृत्रिमरित्या तयार केलेले पदार्थ (जंक फूड), तळलेले पदार्थ इत्यादींचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अली यांनी जीवनशैलीत आमूलाग्र बदल करून दारू, तंबाखू आणि स्निग्ध पदार्थांचे सेवन टाळावे, तसेच संपूर्णपणे वनस्पतीजन्य पदार्थांचेच सेवन करावे, असे सुचवले. या जीवनशैलीमुळे कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ. योगिता बावसकर (आहारतज्ञ, जळगाव) आणि डॉ. नितीन नांदुरकर (इंडियन सोसायटी ऑफ लाइफस्टाइलचे सदस्य) यांनीही संपूर्ण वनस्पतीजन्य (WPB) पदार्थांच्या सेवनाचे फायदे विषद केले.

या व्याख्यानाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, पदव्युत्तर आणि एमबीबीएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर इंडियन सोसायटी ऑफ लाइफस्टाइल मेडिसिन (ISLM) च्या वतीने प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय मोरे, डॉ. गिरीश उगले आणि डॉ. गोविंद पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सुरकान सिद्दिकी यांनी केले.


Protected Content

Play sound