पुणे प्रतिनिधी । ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा गुरुवारी अमेरिकेहून पुण्यात परतू शकत नसल्यामुळे गुरुवारी होणारा अंत्यसंस्कार विधी शुक्रवारी सकाळी होणार असल्याचे कुटुंबीयांतर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी डॉ.लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात सकाळी दहा ते अकरा या वेळात ठेवण्यात येणार आहे.
‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत आपल्या अभिनयातून रसिकांचे हदय हेलावून टाकणारे नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर, ‘देवाला रिटायर करा’ असे सांगत समाजातील धार्मिक परंपरावादाला आव्हान देणारे, ‘मी देव मानत नाही’ अशी ठाम भूमिका घेणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि.१७ डिसेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांचे पार्थिव शीत शवागारामध्ये ठेवण्यात आले. अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. लागू यांचे पुत्र आनंद लागू पुण्याला येण्यासाठी रवाना झाले आहेत. ते पोहोचल्यानंतर डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.