Home आरोग्य ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे जळगावात व्याख्यान 

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे जळगावात व्याख्यान 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉ. गोगुलवार नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्त्व आणि त्याची योग्य काळजी कशी घ्यावी यावर ते सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता रोटरी हॉल, गणपती नगर, जळगाव येथे होणार आहे. व्याख्यानासोबतच सातपुडा परिसरातील आदिवासी भगिनींनी मोहफुलांपासून तयार केलेल्या पौष्टिक पदार्थांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पोषणमूल्यांविषयी जनजागृती होणार असल्याचे सांगण्यात आले.

व्याख्यान सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound