
मुंबई (वृत्तसंस्था) आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेर या तिघं ही जणी किरकोळ कारणावरून सातत्याने डॉ. पायल तडवी यांना जातिवाचक शब्द वापरून अपमानित करत असत, असा जबाब प्रमुख साक्षीदाराने दिल्याची माहिती गुरुवारी गुन्हे शाखेने सत्र न्यायालयाला दिली. त्यामुळे डॉ. पायल तडवीचा जातिवाचक छळ झालाय आता हे उघड झालेय.
पायल अनुसूचित जमातीची आहे हे आरोपी डॉक्टरना माहीत होते. त्यामुळे त्यांनी केलेला छळ ही कृती गुन्हेगारी कटाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात प्रवेश घेतल्यापासून पायल यांचा छळ सुरू होता. अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणातून प्रवेश मिळाल्यामुळेच पायलचा छळ सुरू होता हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होते, असा दावा देखील गुन्हे शाखेने न्यायालयात केला. या कटात आणखी कोण सहभागी आहे किंवा आरोपी डॉक्टरनी पायलचा छळ कोणाच्या सांगण्यावरून केला हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका गुन्हे शाखेने न्यायालयात घेतली. एवढेच नव्हे तर, तिन्ही आरोपी डॉक्टर उच्चशिक्षित असून गुन्हा नोंद झाल्यानंतर अत्यंत सराईतपणे त्यांनी अटक टाळली. अटक झाल्यास तिघींनी चौकशीला सहकार्य न करता आरोप कसे नाकारावेत यासाठी व्यूहरचना आखली. त्यानुसार तिन्ही आरोपींनी एकसारखीच माहिती पुढे केली,असे देखील गुन्हे शाखेने न्यायालयाला सांगितले.