Home राजकीय डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न पुरस्कार

डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न पुरस्कार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 17 व्या लोकसभेत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे 17 व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. 2019 ते 2023 या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले आहेत. 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 12 खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत.

आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 2014 च्या लोकसभेत निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. 2019 च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत.

केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.


Protected Content

Play sound