भुसावळ प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आपले पत्ते खुले करत अपक्ष उमेदवार डॉ. मधू मानवतकर यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.
संतोष चौधरी यांनी आधीच सतीश घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. मात्र ऐन वेळी ही जागा आघाडीचा मित्रपक्ष असणार्या पीआरपीला सुटून जगन सोनवणे यांना येथून उमेदवारी मिळाली. यामुळे संतोष चौधरी यांच्या गटाला धक्का बसल्याचे दिसून आले. दरम्यान, चौधरी यांनी शनिवारी आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे घोषीत केले होते. या अनुषंगाने आज सायंकाळी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी अपक्ष उमेदवार डॉ. मधू मानवतकर यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. यामुळे आता संजय सावकारे आणि जगन सोनवणे यांच्याशी डॉ. मधू मानवतकर यांचा मुकाबला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या मेळाव्यात संतोष चौधरी यांनी आमदार संजय सावकारे व पीआरपीचे उमेदवार जगन सोनवणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. डॉ. मधू मानवतकर यांच्या माध्यमातून भुसावळातून पहिल्यांदाच एक महिला आमदार बनणार असल्याचा आशावाददेखील त्यांनी प्रकट केला. याप्रसंगी व्यासपीठावर उमेदवार डॉ. मधू मानवतकर, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, बाजार समिती सभापती सचिन चौधरी आदींसह जनआधार आघाडीचे नगरसेवक व संतोष चौधरी यांचे प्रमुख समर्थकांची उपस्थिती होती.