जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार करत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे यांनी आज वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत प्रत्येक घरात जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठांशी संवाद आणि आपुलकीची विचारपूस :
प्रचारादरम्यान डॉ. अमृता सोनवणे यांनी केवळ मते न मागता, भागातील वृद्ध नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेत असतानाच, आगामी काळात प्रभागाचा कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्वच प्रभागाचा विकास करू शकते,” अशी भावना यावेळी मतदारांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी महिलांनी घराबाहेर येऊन डॉ. अमृताताईंचे औक्षण केले आणि विजयाचा टिळा लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.

उमेदवारांची वज्रमुठ आणि एकजूट :
महायुतीचे चारही उमेदवार डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील, सिंधूताई कोल्हे आणि ललित कोल्हे यांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येत प्रचाराची रणनीती आखली आहे. कार्यकर्त्यांनीही हातात हात धरून आणि एकजुटीने प्रचारात कंबर कसली आहे. जिजाऊ नगर, श्याम नगर, हनुमान नगर आणि आसपासच्या परिसरांमध्ये आज भव्य रॅली आणि कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीच्या या एकजुटीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विकासासाठी मतदारांचा कौल :
प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते, पाणी आणि सार्वजनिक सुविधांबाबतच्या अपेक्षा उमेदवारांकडे व्यक्त केल्या. मतदारांनी “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास दिल्याने उमेदवारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. प्रचाराच्या या शेवटच्या दिवसांत महायुतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, प्रभाग ११ मध्ये सध्या भगवे वातावरण पाहायला मिळत आहे.



