मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी दिवसभर मोठे राजकीय नाट्य घडले. अजित पवार आणि सहकार्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर स्वत: शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपण कोणतीही कायदेशीर लढाई करणार नसल्याचे सूतोवाच केले होते. नंतर मात्र यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास जयंत पाटील आणि सुप्रीया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नवीन माहिती दिली. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधार्यांचे सोबत करत मंत्रीपदाची शपथ घेतली असून यासाठी शरद पवार यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. यामुळे त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. तसेच अजितादादांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. यानंतर काल दुपारी अजित पवारांसह नऊ आमदार आणि काही पदाधिकार्यांना पक्षातूननिलंबीत करण्यात आले. याच्या सोबतीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना देखील पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
अजितदादा पवार यांच्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित असल्याने ते दादांसोबत राहतील असे मानले जात होते. मात्र त्यांनी दुसर्याच दिवशी म्हणजे सोमवारी आपण शरद पवार साहेबांच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली होती. या संदर्भात त्यांनी ट्विट केले होते. यानंतर आज सकाळी त्यांनी आपण आज शरद पवार यांना भेटून आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. टिव्ही नाईन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे.
अमोल कोल्हे यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याबाबत दोन्ही गटांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.